महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, मंत्रालय कक्षाधिकारी, तहसीलदार व इतर पदांकरीता सरळ भरती असते. या दिवसात नियोजनपूर्वक केलेला अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचा आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ‘सामान्य क्षमता चाचणी’ हा एकच पेपर असतो. एकूण २०० बहुपर्यायी प्रश्न असलेला हा पेपर २ तासांत सोडवायचा असतो. या पेपरमध्ये कला शाखा घटक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व अर्थव्यवस्था, कृषीशास्त्र, प्रचलित घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी असे सहा उपघटक असतात.
कला शाखा घटकासंबंधी ३० ते ४० गुणांचे प्रश्न विचारले जातात. कलाशाखा घटक ५ भागांत विभागलेले असून प्रत्येक
विभागाला साधारणत: ६ ते ७ गुणांचे प्रश्न विचारले जातात. कला शाखा घटकातील विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
इतिहास, समाजसुधारक, भारतीय राज्यपद्धती, पंचायतराज, भूगोल.
आता आपण विभागावर माहिती घेऊ.
इतिहास : इतिहासावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. इतिहासात सनावळी लक्षात ठेवणे जरी थोडेसे कठीण असले तरी अशक्य नसते. इतिहास हा विषय अभ्यासताना ब्रिटिश सत्तेची पायाभरणी व विस्तार, ब्रिटिश सत्तेचे दृढीकरण, १८५७ चा उठाव, काँग्रेसची स्थापना, जहालांचा कालखंड, गांधीजींचा कालखंड, स्वातंत्र्यप्राप्तीकडे वाटचाल, क्रांतिकारी चळवळ, भारतीय प्रबोधनाचा कालखंड इत्यादी घटक येतात. या घटकांचा सुनियोजित अभ्यास करणे आवश्यक असते.
इतिहासासाठी खालील पुस्तके अभ्यासावीत.
(१) आधुनिक भारताचा इतिहास: भाग २ व ३ – सुमन वैद्य
(२) आधुनिक भारताचा इतिहास: जयसिंगराव पवार
समाजसुधारक : या घटकावर साधारणत: ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. महाराष्ट्रात ब्रिटिशांचे राज्य आले. त्यांची विचारसरणी- साहित्य- प्रशासन-कायदे इत्यादीमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनात प्रचंड उलथापालथ झाली. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या एका नव्या पिढीने प्रबोधनाच्या चळवळीला प्रारंभ केला. पाश्चात्त्य शिक्षण घेतल्यामुळे एतद्देशीयांमधील दोष या पिढीच्या लक्षात येऊ लागले. भारतीय वर्गव्यवस्था, जातीयता, स्त्रियांच्या समस्यांकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. समाजसुधारकांनी नियतकालिकांमधून आपले विचार मांडले. त्यांच्या समाजकार्याला कालसापेक्ष मर्यादा होत्या, परंतु पुढच्या चळवळीचा पाया त्यांनीच भक्कम केला. वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांच्या माध्यमातून समाजसुधारकांनी समाजजागृतीचे कार्य केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास या घटकांर्गत प्रश्न पुढील विषयांवर आधारित असतात.
सामाजिक संस्था, समाजसुधारक, समाजसुधारकांची ग्रंथसंपदा, वृत्तपत्रे, काही ठळक/ उल्लेखनीय घटना व वर्षे.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) भारतीय समाजसुधारक: फडके प्रकाशन
(२) महाराष्ट्रातील समाजसुधारक- चाणक्य मंडल प्रकाशन
* भूगोल : भूगोलावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भूगोल या घटकात भारताच्या भूगोलासहित महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास करणे आवश्यक असते. या भागाचा व्यवस्थित नियोजनाने अभ्यास केल्यास सर्वच्या सर्व गुण मिळू शकतात.
भारताचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक रचना, मृदा, नदी प्रणाली, वने, प्रकल्प, यावर भर असावा तर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, मृदा, वने, जलसिंचन, कृषी, ऊर्जा साधने, खनिजसंपत्ती उद्योगधंदे, लोकसंख्या, वाहतूक, पर्यटन या घटकांवर भर द्यावा.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके
(२) महाराष्ट्र- डॉ. संतोष दास्ताने
राज्यपद्धती : या घटकावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यपद्धती या घटकात भारतीय राज्यघटनेचा इतिहास, राज्यघटनेची वैशिष्टय़े, राज्यघटनेत समाविष्ट बाबी, केंद्रीय कार्यकारी व कायदेमंडळ, घटक राज्याचे कार्यकारी व कायदेमंडळ, सर्वोच्च व उच्च न्यायालय, केंद्र- राज्य संबंध, घटना दुरुस्त्या व कलमे यांचा समावेश आहे. तसेच काही महत्त्वाची पदे, त्यांची वेतने, त्यांची आवश्यकता, अधिकार व कार्य इत्यादी गोष्टींचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केल्यास राज्यपद्धतीचे सर्वच्या सर्व गुण मिळविणे अजिबात कठीण नाही.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) भारतीय राज्यपद्धती- प्रा. बी. बी. पाटील.
(२) भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार- डॉ. बाचल.
ग्रामप्रशासन : या घटकावर साधारणपणे ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. यामध्ये ग्रामप्रशासनातील तीन स्तर म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकशाही विक्रेंद्रीकरणाचा इतिहास, लोकशाही विकेद्रीकरणासाठीच्या विविध समित्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. ग्रामप्रशासनातील तीन स्तर, त्या प्रत्येक स्तरावर कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे. या सोबतच महसूल व पोलीस प्रशासन, नेमणूक, निवड इत्यादी विषयांवरही प्रश्न विचारले जातात.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) नागरिकशास्त्र : इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके.
कला शाखेतील विभागानंतर आता इतर घटकांची माहिती घेऊ.
विज्ञान-तंत्रज्ञान :
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर साधारणत: २५ ते ३० प्रश्न विचारले जातात. या विषयाचे योग्य मार्गदर्शन आणि योग्य संदर्भ पुस्तकांचा आधार घेतल्यास किंवा वाचन केल्यास हा विषय विद्यार्थ्यांस पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारले जाणारे प्रश्न खालील घटकांवर आधारित असतात. विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानातील गृहीते, वैज्ञानिक पद्धती, केवलगणन पद्धती, साम्यानुमान आणि प्रतिकृती, सिद्धांत कल्पना (अभ्युपगम), शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान, मूलभूत शास्त्रीय संकल्पना, आरोग्य, उत्पादकता, वाहतूक आणि विनिमय, परंपरा, संस्कृती, धर्म आणि मानवी मूल्ये, आधुनिकीकरण व भारतीय समाज, परिसर आणि प्रदूषण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उत्तुंग झेप, तंत्रज्ञानाधिष्ठित समाज. दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर २५ ते ३० प्रश्न विचारले जात असले तरी कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारतील हे निश्चित सांगता येत नाही आणि या विषयाच्या एखाद्या घटकाबद्दलही हेच तत्त्व लागू पडते म्हणून विद्यार्थ्यांचा या विषयासंबंधी अभ्यास सखोल असणे आवश्यक आहे.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन- सेठ प्रकाशन.
(२) इयत्ता आठवी ते दहावीची सामान्य विज्ञानाची पुस्तके.
कृषीशास्त्र :
या विषयावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. कृषी हा विषय समजण्यास सोपा व काळजीपूर्वक अभ्यास केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. कृषीविषयक घटकांत शेती व शेतीशी संलग्न विषय मोडतात. हे खालीलप्रमाणे-
जमिनीचा वापर व प्रमुख पिके. यात कृषी-हवामान, खरीप-रब्बी पिके, प्रमुख पिके, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिकांची लागवड या विषयी प्रश्न असतात.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, वनविकास व वन उत्पादने, मत्स्यव्यवसाय यावर प्रश्न असतात.
कृषी अर्थशास्त्रामध्ये शेती व्यवस्थापनशास्त्र, शेती नियोजन व अर्थसंकल्प, कृषी वित्तपुरवठा प्रकार, भू-अधिकारविषयक सुधारणा, शेतमाल विक्री व्यवस्था, भारतातील पंचवार्षिक योजना व शेती व्यवसाय या विषयावर प्रश्न असतात.
अभ्यासासाठी पुस्तके
(१) कृषीशास्त्र- पंचम प्रकाशन.
(२) कृषी अर्थव्यवस्था- डॉ. विजय कविमंडन.
वाणिज्य व अर्थव्यवस्था :
या घटकावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. ज्या आर्थिक घटकांशी प्रशासनाचा संबंध येतो अशा घटकांवर आधारित हे प्रश्न असतात. साधारणपणे शासकीय अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना, भारतीय बँकिंग यावर जास्त भर देण्यात आलेला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था यात भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, लोकसंख्या, भारताचा आयात-निर्यात व्यापार, परकीय कर्जे, भारताचे नियोजन तर शासकीय अर्थव्यवस्था यात शासनाची आर्थिक धोरणे, भारतातील करप्रणाली याचा अभ्यास करावा. भारतीय बँकिंग यात राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिका, बँकांचे राष्ट्रीयीकरण, कृषी पतपुरवठा, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास करावा.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) देसाई व भालेराव.
(२) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) भोसले व काटे.
प्रचलित घडामोडी :
या विषयावर जवळपास २० ते २५ प्रश्न विचारले जातात. मागील दहा वषार्ंतील राज्यसेवा पूर्वपरीक्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या पटकन लक्षात येणारी बाब म्हणजे चालू घडामोडीवर पूर्वपरीक्षेच्या आधी एक ते दीड वर्षांपासून ते परीक्षेच्या अगोदर एक महिन्यापर्यंत घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. यामध्ये आपल्याला साधारणपणे दहा विभाग पाडता येतात. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी, प्रसिद्ध व्यक्ती परिषदा- स्थळे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडाविषयक घडामोडी, दिनविशेष विविध समित्या, अन्य प्रचलित घडामोडी. या घटकाचा अभ्यास करताना नियमित वृत्तपत्र वाचन असावे तसेच स्पर्धा परीक्षांकरिता वाहिलेली मासिके तसेच योजना, लोकराज्य वाचावे.
बुद्धिमापन चाचणी :
या घटकावर २०० पैकी ५० प्रश्न असतात. या विषयाच्या प्रश्नांची संख्या बघता परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या प्रश्नांवर जास्त तयारी करणे आवश्यक आहे आणि हा एकमेव विषय असा आहे की, ज्यात ठरवून पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात.
बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडविण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक ठरतात. (१) तर्कशुद्ध विचार (Logical Thinking) (२) सराव (Practice)
या दोन्हींसाठी वेगवेगळ्या पुस्तकातील विविध प्रकारचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आधीच्या प्रश्नपत्रिकांवरून बघता येईल.
या घटकात संख्या श्रेणी, संख्यारचना, संख्या संबंध, अक्षर-अक्षर संबंध, अक्षर-अंक संबंध, विसंगत पर्याय, शब्द-शब्द संबंध यावर प्रश्न असतात.
अभ्यासाकरिता पुस्तके
(१) मानसिक क्षमता कसोटी- वा. ना. दांडेकर.
(२) स्पर्धा परीक्षा- बुद्धिमापन चाचणी- वा. ना. दांडेकर.
वरील सर्व घटकांचा समावेश असणारे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयार केलेली गाईडस् व प्रश्नसंच बाजारात उपलब्ध आहेत. यांचाही अभ्यासाकरिता चांगला उपयोग होतो.
पेपर लिहिण्याचे तंत्र :
आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर लिहिण्याच्या तंत्राविषयी माहिती घेऊया.
बहुपर्यायी प्रश्नांमध्ये एक प्रश्न देऊन त्याच्या खाली अ, ब, क, ड या प्रकारे चार पर्याय दिलेले असतात व त्यातून एका योग्य पर्यायाची निवड करून त्या पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल करावयाचा असतो. त्यावरून विद्यार्थ्यांच्या त्या घटनेची किती अचूक माहिती आहे हे बघितले जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चाळणी परीेक्षा असते. यात पास झालात तरच मुख्य परीक्षेला प्रवेश दिला जातो. म्हणूनच या परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य, वेळेचे सुयोग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो.
सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे पेपरसाठी परीक्षा केंद्रावर पुरेसे आधी पोहोचणे. धांदल नको तसेच मन शांत, एकाग्र ठेवणे महत्त्वाचे असते. उत्तरपत्रिकेत एकाच प्रश्नात एकापेक्षा जास्त गोल आढळले तर त्यातील एक उत्तर बरोबर असून देखील एकूण उत्तर चुकीचे धरले जाते. त्यामुळे उत्तरांचा गोल हा विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना सलगच प्रश्न सोडवावेत, असे कुठलेही बंधन नसते, तर जसे प्रश्न येतील तसे सोडवावेत. मात्र उत्तरपत्रिकेत काळजीपूर्वक त्याच नंबरच्या प्रश्नांच्या पुढे उत्तर लिहावे, नाही तर गोंधळ निर्माण होतो. यानंतर वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे असते. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर ५ मिनिटे ती वाचण्यासाठी द्यावीत. मात्र त्या वेळी पेपर कितीही अवघड असला तरी निराश होऊ नये, अगर कितीही सोपा असला तरी हरखून जाऊ नये. कारण वरील दोन्ही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हातून जास्त चुका होण्याची शक्यता असते.
परीक्षेच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे सगळ्यांनी सारखाच अभ्यास केलेला असतो. त्यामुळे पेपर हा सर्वानाच अवघड किंवा सोपा वाटू लागतो. अशा वेळी स्थितप्रज्ञ असणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका चांगली पंधरा-सोळा पानी असते. प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या जागीच कच्चे काम करावे लागते. इतर कागदांवर कच्चे काम केल्यास ते अयोग्य मानले जाते. पेपर चाळून झाल्यावर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची. पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवताना खाली दिल्याप्रमाणे अ, ब, क हे प्रकार फार महत्त्वाचे आहेत. या तीन पद्धतीनुसार पेपर सोडवला असता नियोजित वेळेत तो पूर्ण होण्यास मदत होते.
‘अ’ प्रकार : या प्रकारात ज्या प्रश्नांची आपल्याला पूर्णपणे अचूक उत्तराची खात्री आहे तेच प्रश्न फक्त सोडवायचे असतात. एकूण २०० प्रश्नांपैकी जेवढे जास्तीत जास्त प्रश्न ‘अ’ प्रकारात सोडवता येतील तेवढे. तुमचे खात्रीचे गुण आहेत. तसेच ‘अ’ प्रकाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रश्न हे कमीत कमी वेळात सोडवू शकतो. त्यामुळे इतर अवघड प्रश्नांचा विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. म्हणून ‘अ’ प्रकार काळजीपूर्वक वापरावा. ‘अ’ प्रकारात न सोडवलेल्या प्रश्नांचे नंबर कच्च्या कागदावर टाका. त्यामुळे तेवढय़ाच प्रश्नांवर पुढील ‘ब’ व ‘क’ पद्धतीत भर देता येईल.
‘ब’ प्रकार : या प्रकारात केवळ प्रश्न पाहिल्यावर उत्तर सुचत नाही तर चारही पर्याय पाहावे लागतात. स्मरणशक्तीला थोडा ताण दिला की, उत्तर आठवते. अनेक वेळा पेपरमधील परस्पर प्रश्नांत देखील एकमेकांची उत्तरे सापडू शकतात. तसेच जोडय़ा जुळवा प्रकारात देखील नीट विचार केला तर योग्य उत्तर सापडू शकते. बुद्धिमापन चाचणीतील आकडेमोड, वेगवेगळी लॉजिक यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. या प्रकारात जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क पद्धतीत जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क प्रकारात येतात.
‘क’ प्रकार : सर्वसाधारणपणे ‘क’ प्रकार म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर अजिबात आठवत नाही, असे प्रश्न होय. सामान्यत: ‘क’ प्रकारात जेवढे कमी किंवा जास्त प्रश्न राहिले असतील त्यावरून पेपर सोपा किंवा अवघड हे समजते. पूर्वी ‘क’ प्रकारातील प्रश्नांच्या उत्तरांसाठी चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचे अक्षर निवडून सर्व क प्रकारातील प्रश्नांना त्या अक्षराचे उत्तर लिहिले जायचे. ०.२५ टक्के निगेटिव्ह मार्क पद्धती या परीक्षेला पहिल्यांदा लागू झाली आहे. त्यामुळे क प्रकारातील प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवेत. या पद्धतीला method of elimination असे म्हणतात. या पद्धतीत ४ पर्यायांपैकी एकच बरोबर असेल तर पूर्ण मटका मारण्यापेक्षा (म्हणजे चारही पर्यायांबद्दल काहीच खात्री नसणे) असे प्रश्न वेगळे लिहून ठेवावेत की ज्यात किमान १ किंवा निदान २ तरी पर्याय तुम्ही नक्की चूक ठरवू शकलेले आहात. जरी ठाम उत्तर माहिती नसेल तरीही फक्त दोनच पर्यायांतील एक पर्याय सहज निवडला, मटका मारला तरी दर ४ प्रश्नांमध्ये निदान एक तरी उत्तर बरोबर येण्याची शक्यता खूपच चांगली आहे आणि आपण हे लक्षात घेऊ की MPSC मध्ये चार प्रश्नांपैकी एक जरी बरोबर आला आणि उरलेले तीनच्या तीन चुकले तर तुमचे एकूण गुण हे बरोबरचा १ गुण व चुकलेल्या तीन प्रश्नांचे ०.७५ गुण म्हणजेच ०.२५ गुणांचा फायदा आहे. या ०.२५ गुणाधिक्यामुळे तुम्ही तुमच्या बऱ्याच प्रतिस्पध्र्याना मागे टाकलेले असते.
अ, ब, क प्रकारानुसार पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवला गेल्यास वेळेचा पूर्णपणे वापर होऊन जास्तीत जास्त गुण मिळवून यश नक्कीच खेचून आणता येईल।
स्रोत - लोकप्रभा
अगदी छान लिहिले आहेस, असेच लिहीत रहा, महेश
उत्तर द्याहटवामला या लेखाचा MPSC ची बेसिक माहिती साठी खूप उपयोग झाला. मला अपेक्षा आहे की तुम्ही MPSC बद्दल आणखीन लिहताल. धन्यवाद. Dhasalkar B.
उत्तर द्याहटवा